संतोष वानखडे, वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांना अग्रक्रमाने प्राधान्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना ठेवा, अशी एकमुखी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी ३१ मे रोजी स्थायी समितीच्या सभेत केली. यावर रोहयोंतर्गतची सिंचन विहिर, गोठ्याची कामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी गटविकास अधिकाऱ्यांसह अंमलबजावणी यंत्रणेला दिले.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात दुपारी २ वाजताच्या सुमारास स्थायी समितीच्या सभेला सुरूवात झाली. सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. व्यासपिठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सभापती अशोक डोंगरदिवे, सभापती वैशाली प्रमोद लळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांची उपस्थिती होती.
सभेच्या सुरूवातीला जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे शुद्ध व नियमित पाणी पोहोचविण्याची व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा, पाणीपुरवठा योजनेसाठी एक्सप्रेस किंवा गावठाण फिडरवरून वीजजोडणी घ्यावी, विद्युत व्यवस्थेसाठी अंदाजपत्रकातील अपूरी तरतूद व प्रत्यक्ष खर्च याची सांगड घालणे आदी मुद्यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य डाॅ. सुधीर कवर यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश पिठासीन अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. रोजगार हमी योजनेंतर्गतच्या सिंचन विहिरींच्या प्रलंबित कामांवरूनही डाॅ. सुधीर कवर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालण्याचा मुद्दा उचलून धरला.
या चर्चेत उपाध्यक्ष चक्रधर गोटे, सदस्य पांडूरंग ठाकरे, उमेश ठाकरे, अरविंद पाटील इंगोले, डाॅ. शाम गाभणे यांनीदेखील सहभाग नोंदविला. यावर तालुकानिहाय सिंचन विहिरींचा एकंदरित लेखाजोखा मांडण्याच्या सूचना चंद्रकांत ठाकरे व वसुमना पंत यांनी दिल्या. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी विहिरींच्या कामांचा लेखाजोखा सादर केला. विशेषत: वाशिमच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सिंचन विहिरींच्या तसेच गोठ्याच्या कामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या. ग्रामपंचायत स्तरावरील ऑपरेटर, रस्ते दर्जोन्नती, समाजकल्याण विभागांतर्गतचा वाढीव निधी, नवीन वस्ती यांसह अन्य विषयांवरही चर्चा झाली.