यासंदर्भातील पत्रात असोसिएशनचे राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शिरसाट, सचिव नंदकिशोर झंवर यांनी नमूद केले आहे की, संपूर्ण राज्यात लसीकरणाचा कार्यक्रम युद्धस्तरावर सुरू झाला आहे. औषधी विक्रेते व याअंतर्गतचे कर्मचारी स्वतः च्या जीवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहेत. त्यामुळेच औषधी पुरवठा सुरळित राहणे शक्य होत आहे. औषधी विक्रेत्यांचा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष जवळून संबंध येतो. यामुळे औषधी विक्रेता व त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याची होण्याची दाट शक्यता आहे. देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते कोविडला बळी पडले असून आतापर्यंत एक हजारांहून अधिक परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झाले आहेत. असे असताना केंद्र व राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु लसीकरणातही या लोकांना प्राधान्य देण्याचे औदार्य दाखविले नाही, अशी खंत औषधी विक्रेत्यांमधून व्यक्त होत आहे. तथापि, संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल शासनाने घ्यावी व लसीकरणात आैषधी विक्रेते व त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अन्यथा नाईलाजाने व्यवसाय बंद ठेवावा लागेन, असा इशारा देण्यात आला.
लसीकरणात प्राधान्य द्या; अन्यथा व्यवसाय बंद ठेवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:36 AM