राज्यातील कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेले असून, सदर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देऊन त्यांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, शालार्थ आयडी देणेबाबत कार्यशाळेचे आयोजन जिल्हा स्तरावर करण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देऊन केली आहे.
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय. महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या आदेशाचे त्वरित पालन करून सदर कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत ३१ मे २०२१ पूर्वी नियमानुसार कार्यवाही करून शालार्थ आयडी देण्यात यावे व यापुढे त्यांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने अदा करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी सरनाईक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.