वाशिम: जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अशात जिल्हा पाणी आरक्षण समितीने सर्वच प्रकल्प आणि बॅरेजेसमधील शेतीसाठी होणारा उपसा थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे यंदा रब्बीची पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके संकटात सापडली आहेत. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत असून, आम्हाला शेतीसाठी पाणी द्या किंवा पेरणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्यावतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्यात यंदा ८४ टक्के पाऊस पडल्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. अनेक प्रकल्प आटले असून, उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्हाभरात पाणीटंचाई तीव्र होणार आहे. या पृष्ठभूमीवर पाणी आरक्षण समितीने जिल्ह्यातील ९२ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव केले; परंतु हा निर्णय घेण्यापूर्वीच शेतकºयांनी प्रकल्प किंवा बॅरेजेसमधील पाण्याच्या भरवशावर रब्बीची पेरणी केली आहे. आता जिल्हा प्रशासनाने बॅरेजेस आणि प्रकल्पातील पाणी शेतीसाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे रब्बीची पिके अडचणीत सापडली आहेत. प्रशासनाने रब्बीच्या पूर्वीच हे नियोजन केले असते तर, शेतकºयांनी पेरणी केली नसती, असे शेतकºयांचे म्हणने असून, आता जिल्हा प्रशासनाने पाणी उपशावर घातलेला प्रतिबंध रद्द करावा किंवा बॅरेजेस आणि प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर रब्बीची पेरणी केलेल्या शेतकºयांना हेक्टरी २० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेतील वाशिम जिल्हाध्यक्ष अरविंद अहिरे पाटील, जिल्हा प्रवक्ता उध्दव ढेकळे यांच्यासह युवा तालुका प्रतिनिधी गणेश वायचाळ, शिवाजी गोटे, के.पी. कापसे, टी.जी. वायचाळ, अनिल वानखडे, गणेश वायचाळ, विजय गायकवाड, तुळशिराम गोटे, नारायणराव देशमुख, तुळशीराम गोटे, पवार आदिंनी ही मागणी केली आहे.