लोककलावंतांना राज्य सरकारने अलिकडेच पाच हजारांची मदत जाहीर केली; मात्र मदत प्रत्यक्ष हाती कधी पडणार, याची शाश्वती नाही. मिळणाऱ्या मदतीतून आगामी काळात याच कलावंतांकडून जिल्ह्यात विविध योजनांच्या जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जाणार आहे. त्यामुळे कलावंतांना मदतीचा फारसा लाभ होणार नसल्याचा सूर उमटत आहे.
..............
हाती शिल्लक काहीच राहणार नाही
कोरोनाच्या संकटकाळात जनजागृतीचे सर्वच कार्यक्रम बंद राहिल्याने लोककलावंतांवर उपासमारीची वेळ ओढवली.
शासनाने आता पाच हजारांची मदत जाहीर केली. त्यानुसार यादी तयार झाल्यानंतर संबंधितांना मदत मिळणार; मात्र कित्येक दिवसांपासून हाताला काम नसल्याने उधारी फेडल्यानंतर हाती शिल्लक काहीच राहणार नाही.
...............
राज्य सरकारची मदत कधी मिळणार?
लोककलावंतांना राज्य सरकारने पाच हजारांची मदत जाहीर केली. त्यानुसार, प्रशासनाने पात्र कलावंतांच्या याद्या तयार करणे सुरू केले.
तयार झालेली यादी शासनाकडून पाठविली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मदतीची रक्कम पाठविली जाणार. यात बराच कालावधी लागणार आहे.
.........................
कलावंतांची फरफट
कोरोनामुळे प्रशासनाकडून मिळणाऱ्या सर्वच जनजागृतीपर कार्यक्रम थांबले आहेत. यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. शेळीपालनाच्या माध्यमातून घर खर्च भागविण्याचा प्रयत्न करीत आहे.
- संतोष खडसे
............
शासनाने कलावंतांना कोणतीच मदत देऊन उपकार करू नये; तर जनजागृतीपर कार्यक्रम सुरू करून हाताला काम मिळवून द्यावे. यामुळे लोककला जिवंत राहण्यासोबतच लोककलावंतही जगू शकेल.
- प्रज्ञानंद भगत
...........
गेल्या कित्येक दिवसांपासून हाताला काम नाही. त्यामुळे अंगी असलेली कला कुठेतरी थिजल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हाताला काम मिळत नसल्याने कुटुंबाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे.
- कविनंद गायकवाड
............
जिल्ह्यात २०० कलावंतांची यादी
जिल्ह्यात अंगी विविध प्रकारची कला असलेले शेकडो कलावंत आहेत. त्यांच्या कलेला मात्र प्रोत्साहन मिळणे कठीण झाले आहे.
प्रशासनाकडे सुमारे २०० कलावंतांची यादी असून, त्यापैकीच काहींना पाच हजारांची मदत जाहीर होणार आहे.