वाशिम : केवळ अत्यावश्यक सेवेसाठी महामंडळाच्या एसटी बसेस सुरू आहे. परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची नोंदणी केल्या जात आहे. यावेळी सर्व प्रवासी रुग्णालयात जातोय, अंत्यसंस्काराला जातोय, नातेवाईक भरती आहे, अशी कारणे सांगत आहे. यावेळी प्रवाशांजवळ अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र नसल्यास प्रवासासाठी मनाई करण्यात येते, असे आगारप्रमुखांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदीची सुधारित नियमावली जिल्ह्यात १५ मे पर्यंत लागू करण्यात आली आहे. यामध्ये महामंडळाची एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. तरी परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात अत्यावश्यक कामानिमित्त अनेकजण येत आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची बसस्थानकावर नोंदणी करण्यात येत आहे. यादरम्यान या प्रवाशांकडून जिल्ह्यात येण्याची कारणे विचारण्यात येतात. यामध्ये बहुतांश प्रवासी हे आरोग्याची कारणे पुढे करीत आहेत. कोणाला रुग्णालयात जायचे आहे, तर कोणाला अंत्यसंस्काराला जायचे आहे. या प्रवाशांच्या गृह विलगीकरणाविषयी अद्याप यंत्रणेला कुठलीही माहिती नाही.
--बॉक्स--
आगारात शुकशुकाट
प्रवासी संख्या कमी असल्याने जिल्ह्यात दैनंदिन केवळ ६-८ बसेस बसस्थानकातून सुटत आहे; मात्र बसस्थानकात प्रवासी नसल्याने शुकशुकाट पहावयास मिळतो. बसेसची संख्या कमी करून फक्त ६ ते ८ बसेस सोडण्यात येतात. यामध्येही प्रवासी संख्या कमी असते.
--बॉक्स--
प्रवासी घालतात वाद
एसटी बसची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहे; मात्र अनेक प्रवासी हे खासगी कारणानिमित्त जिल्ह्याबाहेर प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळेस त्यांना विचारणा केल्यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालतात.
--बॉक्स--
तीच ती कारणे
अत्यावश्यक सेवेसाठी बसमधून परजिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा आहे. परंतू, त्यासाठी ठाेस कारण आवश्यक आहे. दवाखाना आणि अंत्यसंस्कार ही कारणे बहुतांश प्रवाशांकडून सांगितली जात असल्याचे दिसून येते. नातेवाइक दाखल असल्याने त्यांना भेटण्यासाठी जात असल्याचेही कारण समोर करण्यात येते. इ पास ची मागणी केल्यानंतर ज्यांच्याकडे इ पास नसतो, ते मात्र कर्मचाऱ्यांशी वाद घालत अंत्यसंस्कार व दवाखान्याचे कारण सांगून प्रवास करू देण्याचा आग्रह धरतात. मात्र, परजिल्ह्यात जाण्यासाठी इ पास आवश्यक असल्याने त्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. अत्यावश्यक सेवेत न बसणाऱ्या प्रवाशांना समजविण्यासाठी बस चालक-वाहकाला या होमगार्डची मदत घ्यावी लागत आहे.
--बॉक्स--
लांब पल्ल्याच्या बसेस बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महामंडळाकडून जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक , शिर्डी या लांब पल्ल्याच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.