लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील चिस्तळा येथे अज्ञात चोरट्याने घरातील १ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी बुधवारी सकाळी श्वानपथक दाखल झाले. अमोल तुळशिराम वाघमारे (२८) रा. चिस्तळा यांच्या फिर्यादीनुसार चिस्तळा गावात लग्न समारंभ असल्याने पाहुणे मंडळी आली होती. घरातील धान्याच्या डब्यात जवळपास १ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स ठेवण्यात आली होती. कुणीतरी अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून सदर दागिने लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अमोल वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने, पोलिस निरीक्षक धृृवास बावणकर हे बुधवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाशिम येथून श्वानपथक बोलविण्यात आले. रुबी नामक श्वानने घरातच गिरट्या मारल्या. परंतू, चोरटयाचा थांगपत्ता लागला नाही. मानोरा पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुद्ध कलम ३८० भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास बिट जमादार विजय जाधव, गणेश जाधव करीत आहेत.
चिस्तळा येथून १.१४ लाखाचे सोन्याचे दागिने लंपास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 2:02 PM