वाशिम: फिरायला गाडी, अंगावर महागडे कपडे, बोलायला मोबाइल अन् शौच:विधीसाठी हाती टमरेल, असे चिड आणणारे चित्र गुड मॉर्निंग पथकाच्या तपासणीतून समोर येत आहे. ३० नोव्हेंबर रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरात भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या २५ जणांना समज देण्यात आली.
सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने तीन वर्षांपूर्वीच जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झालेला आहे. जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झाला असला तरी उघड्यावरील शौचवारी थांबता थांबेना, असेच काहीसे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. शौचालय बांधकाम झाल्यानंतरही नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याची बाब निदर्शनात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांच्या नेतृत्वात गुड मॉर्निंग पथकाने पुन्हा एकदा कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. मंगळवारी (दि.३०) जिल्हा चमूद्वारे वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे सकाळच्या सुमारास गुड मॉर्निंग पथकाने धडक देत उघड्यावर शौचास जाणाऱ्या जवळपास २५ नागरिकांना समज देउन सोडण्यात आले. गुड मॉर्निंग पथकात जिल्हा कक्षाचे प्रफुल काळे, रविचंद्र पडघान, प्रविण पान्हेरकर, ओम कुदंर्गे तसेच तालुकास्तरावरील महादेव भोयर उपस्थित होते.