वाशिम: राज्य शासनाने येत्या डिसेंबर २०१९ पर्यंत राज्य हागणदरीमूक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, नागरी भागांत गुडमॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथके सक्रीय करतानाच त्यामध्ये मुख्याधिकाºयांसह नगरसेवकांना सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत; परंतु शासन निर्णयातील आदेशाला दोन महिनेही उलटले नसताना गुडमॉर्निंग पथकांचे काम थंडावल्याचे असून, अधिकारी अंमलबजावणीबाबत दिरंगाई करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
राज्य शासनाच्या स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाने दोन महिन्यांपूर्वी एक निर्णय घेताना महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती आदि स्थानिक स्व्राज्य संस्थांअंतर्गत शहरी भागातील उघड्यावरील शौचवारी थांबविण्यासाठी गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथके सक्रीय करण्याचे निर्देश दिले होते. या पथकांमार्फत उघड्यावरील हागणदरीच्या स्थळांची नियमित तपासणी करून उघड्यावर शौचवारी करताना आढळणाºया व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पथकात स्वत: पालिका आयुक्त, नगर परिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी या अधिकाºयांसह नगरसेवकांनाही सहभागी करून घेण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्याशिवाय या पथकांकडून करण्यात आलेला दैनंदिन अहवाल शासनाच्या स्वच्छ भारत मिशन नावाने सुरू करण्यात आलेल्या व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकण्याचेही आदेश देण्यात आले होते; परंतु या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात होत असल्याचे दिसत नाही. पिरिणामी उघड्यावरील शौचवारीत पुन्हा वाढ झाली आहे.