वाशिम: राज्य शासनाच्या महसूल विभागाने नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास ३१ जानेवारीला मान्यता दिली आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८५७ बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ११५ कोटी २६ लाख ६३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबरच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत खरीप हंगामातील तूर, कपाशीसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानाचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने नुकसानाचा अहवाल विभागीय स्तरावर पाठविला होता. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने २० जानेवारीला शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार शासनाच्या महसूल विभागाने निधी वितरित केला आहे.
त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील ६० हजार २५०.९५ बाधित हेक्टरवरील पिकांची भरपाई मिळणार असून २ लाख ३ हजार ८५७ शेतकऱ्यांना ११५ कोटी २६ लाख ६३ हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे. शासनाने १ जानेवारीला घेतलेल्या निर्णयानुसार प्रचलित नियमापेक्षा वाढीव मदत दिली जाणार असून ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.