वाशिम : यंदा अमरावती विभागात मुबलक पाऊस पडल्याने तूर पिकासाठी पोषक वातावरण असल्याने यंदा या पिकाच्या उत्पादनात सरासरीपेक्षा १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.अमरावती विभागात यंदा सरासरी ४ लाख ३४ हजार ५१ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात या पिकाची पेरणी अपेक्षीत असताना प्रत्यक्ष ३ लाख ८८ हजार २५२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात अकोला जिल्ह्यात ४९ हजार ७३६ हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात ७३ हजार ९२६ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ५० हजार ७२१ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात १ लाख १२ हजार ८१० हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ७ हजार ७३४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अतिपावसामुळे सोयाबीन, उडिद, मुग, कपाशी, ज्वारी आदि पिकांवर विपरित परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी, हा पाऊस तुरीसाठी फायदेशीर ठरला, तसेच कृषी विभागाच्या सल्ल्यामुळे पिकाचे शेंडे खुडण्याचा प्रयोगही फायदेशीर ठरणार असल्याचे मत कृषीतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच यंदा तुरीच्या उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ अपेक्षीत असल्याचेही कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे.
खुश खबर....तुरीच्या उत्पादनात १० टक्के वाढ होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:12 PM