वाशिम: जिल्ह्यात राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुजलाम्, सुफलाम् अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम तालुक्यात चिखली येथे सुरू असलेल्या साठवण तलावाच्या कामाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या तलावाच्या खोदकामातील माती नेण्यासाठी शेतकऱ्यांनी तब्बल ६० ट्रॅक्टर दिले आहेत. पाणीटंचाईच्या समस्येवर कायम मात करून राज्यात जलक्रांती घडवण्यासाठी राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुजलाम्, सुफलाम् अभियान राज्यभरात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिमचाही समावेश असून, या अभियानाद्वारे जलसंधारणाची कामे करण्यासाठी बीजेएसकडून जेसीबी आणि पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर प्रशासकीय विभागाच्या यंत्रणेकडून जलसंधारणाची कामे करून घेण्यात येत आहेत.
वाशिम तालुक्यात या अभियानातून चिखली येथे कृषी विभागामार्फत साठवण तलावाचे काम करण्यात येत आहे. तब्बल १०० चौरस मीटर लांबी-रुंदी असलेल्या या साठवण तलावाचे काम वेगात सुरू असून, या तलावाच्या खोदकामातील माती नेण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यासाठी ६० ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, वाशिम तालुक्यात चिखली येथील साठवण तलावाशिवाय घोटा, सोंडा, वार्ला आणि धुमका येथील खोल समतल चरांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.