वाशिम : ६ महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके तसेच गरोदर व स्तनदा माता यांना महिला व बालकल्याण विभागातर्फे पूरक पोषण आहाराचा लाभ दिला जात असून, आता यामध्ये शासनस्तरावर काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार तेलाऐवजी साखर देण्यात येत आहे. दरम्यान, खाद्यतेलांचे भाव वाढल्याने काटकसर म्हणून साखर देण्यात येत असली तरी, भाजीला फोडणी कशी द्यावी? असा प्रश्न महिला लाभार्थींना पडला आहे.
शिक्षणाविषयी गोडी लागावी तसेच आरोग्य सुदृढ राहावे म्हणून सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरविण्यात येतो. तसेच गरोदर महिला व स्तनदा माता यांनादेखील महिला व बालकल्याण विभागातर्फे आहार पुरविण्यात येतो. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहाराचे दैनंदिन वितरण न करता ५० दिवसांचे अन्नधान्य एकदाच पुरविण्यात येते. जिल्ह्यात ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांची संख्या ३६९११ आहे, तर गरोदर महिला ७८२२ व स्तनदा मातांची संख्या ७२२१ अशी आहे. कोरोना काळात या लाभार्थींना ५० दिवसांचे अन्नधान्याचे कीट एकदाच देण्यात येते. या कीटमध्ये गहू, मूग, मिरची, हळद, मीठ, चना व साखर आदींचा समावेश आहे. यापूर्वी साखरेऐवजी खाद्यतेलाचा समावेश होता. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडत असल्याने कदाचित काटकसर म्हणून खाद्यतेलाऐवजी साखरेचा समावेश केला असावा, अशीही चर्चा महिला लाभार्थींमध्ये आहे. खाद्यतेलाचा समावेश नसल्याने फोडणी कशाने द्यावी? असा प्रश्न महिला लाभार्थींमधून उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्यात मे व जून या महिन्यांतील अन्नधान्याच्या या कीटचे वाटप करण्यात आले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्याकरिता ऑर्डर देण्यात आली आहे.
०००००००
पूरक पोषण आहार योजना...
एकूण लाभार्थी - ५१९५४
६ महिने ते तीन वर्षे - ३६९११
गरोदर महिला लाभार्थी - ७८२२
स्तनदा माता - ७२२१
००००००
काय काय मिळते...
६ महिने ते ३ वर्षे बालकांसाठी गहू (८० ग्राम प्रतिदिन), मूग डाळ (२० ग्राम प्रतिदिन), मिरची (४ ग्राम प्रतिदिन), हळद (४ ग्राम प्रतिदिन), मीठ (८ ग्राम प्रतिदिन), चना (३० ग्राम प्रतिदिन), साखर (२० ग्राम प्रतिदिन) असे साहित्य देण्यात येते.
गरोदर महिला व स्तनदा माता यांच्याकरिता गहू (८८ ग्राम प्रतिदिन), मूग डाळ (३१.५ ग्राम प्रतिदिन), मिरची (४ ग्राम प्रतिदिन), हळद (४ ग्राम प्रतिदिन), मीठ (८ ग्राम प्रतिदिन), चना (४० ग्राम प्रतिदिन), साखर (२० ग्राम प्रतिदिन) या साहित्याचा समावेश आहे.
००००००००००००
घरपोच पूरक पोषण आहाराचे वाटप
कोरोना काळात संबंधित लाभार्थींना घरपोच पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. शासनाच्या नवीन बदलानुसार आता खाद्यतेलाऐवजी साखर मिळणार आहे. शासन आदेशाची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात करण्यात येत आहे.
- संजय जोल्हे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद वाशिम
०००
फोडणी कशी द्यायची; महिलांचा प्रश्न
कोट
पूरक पोषण आहार योजनेंतर्गत यापूर्वी खाद्यतेलाचा समावेश होता. आता यामध्ये बदल केला असून, खाद्यतेलाऐवजी साखर मिळते. त्यामुळे भाजीला फोडणी कशी द्यायची? असा प्रश्न आहे.
- आचल सरकटे
........
पूरक पोषण आहार योजनेंतर्गत दोन महिन्यातून एकदा अन्नधान्याचे कीट देण्यात येते. यापूर्वी खाद्यतेल मिळत असल्याने सोयीचे झाले होते. आता खाद्यतेल मिळणार नसल्याने थोडी गैरसोय होत आहे.
- किरण देवळे
.......
बालकांना पोषण आहाराचे कीट देण्यात येते. कोरोनाकाळात घरपोच साहित्य मिळत आहे. साखर देण्यात आल्याने फोडणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला. पूर्वीप्रमाणेच खाद्यतेल द्यावे.
- संघपाल वानखडे
०००