वाशिम : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दीड कोटी रुपये किमतीपर्यंत नोंदणी असलेल्या वाशिमसह राज्यभरातील कंत्राटदारांना आता ३० सप्टेंबर २०२१पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक, मजूर तसेच बांधकाम क्षेत्रावरही परिणाम झाला. वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व विभागांना कोणतेही बांधकाम हाती न घेण्याच्या तसेच सन २०२०-२१ मधील अर्थसंकल्पीय निधीच्या ३३ टक्के निधी उपलब्ध होईल, या सूत्राच्या अधीन राहून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दीड कोटी किमतीपर्यंत नोंदणी असलेल्या ज्या कंत्राटदाराची नोंदणी जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपुष्टात आली असेल अथवा येणार असेल, अशा सर्व कंत्राटदारांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत विशेष बाब म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने सरसकट मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही वाशिमसह राज्यातील अनेक कंत्राटदारांना नोंदणी करता आली नाही. नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कंत्राटदारांमधून झाल्याने, याची दखल घेत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दीड कोटी रुपये किमतीपर्यंत नोंदणी असलेल्या ज्या कंत्राटदारांची नोंदणी १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत संपुष्टात आली असेल अथवा येणार असेल, अशा सर्व नोंदणीस ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागााने विशेष बाब म्हणून ९ एप्रिल रोजी मुदतवाढ दिली आहे.