वाशिम : अकोला विभागात २० नोव्हेंबरपासून सीसीआयच्यावतीने कापूस पणन महासंघाने कापूस खरेदीसाठी ५ केंद्र सुरु केली. तथापि हंगाम संपला तरी यातील एकाही केंद्रावर क्विंटल भर कापसाचीही खरेदी होवू शकली नाही. त्यामुळे ही केंद्र खरेदीविनाच बंद करावी लागणार आहेत. बाजारात हमीभावापेक्षा खूप अधिक दर असल्याने ही परिस्थिती ओढवल आहे.दरवर्षीप्रमाणे सीसीआयने यंदाही देशभरात शासकीय दराने कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू केली, तर महाराष्ट्रात काही ठिकाणी सीसीआयचे प्रतिनिधी म्हणून कापूस पणन महासंघाकडे (फेडरेशन) ही जबाबदारी सोपविण्यात आली. या अंतर्गत अकोला विभागातील कानशिवणी, बाळापूर, तेल्हारा या तीन ठिकाणी अकोला जिल्ह्यात, तर कारंजा आणि मानोरा या दोन ठिकाणी वाशिम जिल्ह्यात फेडरेशनचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तथापि, २० नोव्हेंबरपासून आजवर यातील एकाही केंद्रावर क्विंटलभर कपाशीही खरेदी होऊ शकली नाही. गत महिन्यात कपाशीचे बाजारातील दर हमीदरापर्यंत घसरल्याने शासकीय खरेदीला बळ मिळण्याची शक्यता होती; परंतु आवश्यक गरजेपोटी ७० टक्क्यांहून अधिक कापूस उत्पादकांनी कपाशीची विक्री उरकली. केवळ बाजारातील दर वाढण्याची अपेक्षा असलेल्या मोठ्या कापूस उत्पादकांकडेच कापूस शिल्लक राहिला होता. त्यामुळे फेडरेशनच्या शासकीय केंद्रांना कपाशीचे बोंडही खरेदी करता आले नाही. आता बाजारात कपाशीचे दर ६५०० रुपयांच्या वर पोहोचले असताना शासनाने कपाशीला केवळ ५४०० रुपये प्रति क्ंिवटल हमीदर घोषीत केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठ केली असून, यंदा खरेदीविनाच फेडरेशनचे कापूस खरेदी केंद्र गाशा गुंडाळणार असल्याचे दिसत आहे.
खरेदीविनाच गुंडाळला जाणार शासकीय कापूस खरेदी केंद्राचा गाशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 4:37 PM