वाशिम : केंद्र सरकारने पीएफआरडीए कायदा रद्द करावा, राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी शासकीय कर्मचाऱ्यांनी वाशिम शहरात मोटारसायकल रॅली काढली. जूनी पेन्शन योजना लागू होण्यासंदर्भात मध्यंतरी राज्यात कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यावेळी ठोस आश्वासन मिळाल्याने आंदोलन तुर्तास मागे घेतले होते. मात्र, जून्या पेन्शनसंदर्भात ठोस कार्यवाही नसल्याचा आरोप करीत कर्मचारी संघटना पुन्हा एकवटत असल्याचे दिसून येते.
केंद्र सरकारने पीएफआरडीए कायदा रहा करावा, राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने सर्वांना लागू करावी व दिलेले आश्वासन पाळावे, खासगीकरण-कंत्राटीकरण धोरणास तिलांजली देवून सर्व कंत्राटी व अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमीत करण्यात याव्यात यांसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्षवेध करण्याकरिता ९ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० ते ३ या वेळेत वाशिम शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने दुपारी १:३० वाजता जुनी जिल्हा परिषद वाशिम येथून रॅलीला सुरूवात झाली. पाटणी चौक, रिसोड नाका, बाकलीवाल विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, शासकीय विश्रामगृह मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रॅलीचा समारोप करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.