लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर : शहरालगत असलेल्या तळजापूर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याण वसतिगृह यावर्षी अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता बाहेरगावी गेल्यानंतर खोली भाड्याने घेऊन शिक्षण घ्यावे लागते. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना ही बाब परवडणारी नसल्याने त्यांना पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे. ही बाब लक्षात घेत शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याणमार्फत तालुका स्तरावर वसतिगृहाची निर्मिती करून त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली; मात्र येथील शासकीय वसतिगृह शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर केवळ पाण्याचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहे, शिवाय घरून शाळेत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, शिक्षणाकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे कठीण झाले आहे. ही बाब गंभीर असून, याकडे तत्काळ लक्ष देऊन वसतिगृह सुरू करणे नितांत गरजेचे असल्याचा सूर विद्यार्थी वर्गात उमटत आहे. गतवर्षी शैक्षणिक साहित्य व गणवेश विद्यार्थ्यांना दिला नाही. तसेच या ठिकाणी व्यायाम शाळा आहे; मात्र साहित्य नाही. तसेच सीसी कॅमेरे बंद आहेत. अशा अनेक समस्या या वसतिगृहात असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.प्रतिक्रिया देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ मंगरुळपीर येथील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह यंदा शैक्षणिक सत्र सुरू होऊनही उघडण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हे वसतिगृह यंदा सुरू आहे की नाही, नसेल तर अद्याप का सुरू होऊ शकले नाही. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वसतिगृह अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला; परंतु आपण सध्या कार्यालयीन कामात व्यस्त असून, नंतर याबाबत माहिती देतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, नंतर त्यांच्याकडून माहितीच मिळू शकली नाही. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला; परंतु त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळू शकला नाही.
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बंद
By admin | Published: July 15, 2017 1:51 AM