अनसिंग : शासनाने कोरोनाच्या काळात नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत धान्य वितरण केले. गरजेपेक्षा जास्त धान्य मिळत असल्यामुळे थेट काळ्याबाजारात राजरोसपणे विकण्याचा प्रकार खेड्यात पाहायला मिळत आहे. काही युवकांकडून या रेशन धान्याची घरोघरी जाऊन खरेदी करण्यात येत आहे.
दहा रुपये किलो दराने तांदूळ, तर ११ रुपये किलो दराने गहू हे युवक नागरिकांकडून खरेदी करतात आणि हॉटेल व्यावसायिक, इडली-डोसा टपरीचालक यांना चढ्या दराने १८ ते २० दराने विकतात. तसेच काही तांदूळ थेट तेलंगणातील व्यापारी व त्यांचे दलाल खरेदी करून त्याला घासाई करून पातळ बनवितात व एचएमटी किंवा श्रीराम या नावाने विकायला पाठवून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
तरी, संबंधितांनी याकडे लक्ष देऊन हा प्रकार थांबविणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांत बाेलले जात आहे.
गावात काही युवक घरोघरी जाऊन धान्य खरेदी करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे . याबाबत तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
- देवराव हरिभाऊ चौतमाल
पोलीसपाटील, उमरा ( शम ) व उमरा कापसे
..................
शेतकऱ्यांना प्रोत्साहन बक्षीस व विम्याची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग : महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन बक्षीस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने राेष व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये अतोनात पावसामुळे शेतक-यांच्या सोयाबीन पिकाचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले होते. काही भागांत पंचनामे होऊन विम्याचे हे आश्वासन हवेत विरले आहे. तसे ई-पीकपाहणी हे राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तयार करण्यात आले. मात्र, आजही ग्रामीण भागात फोरजी, थ्रीजी व टूजी नेटवर्क नसल्यामुळे शक्यतो या वर्षी पेरेपत्रक हे तलाठ्यामार्फत भरावे, अशी मागणी शेतकरी नारायण मानवतकर व रामेश्वर गौरे यांनी केली आहे. नाहीतर, शेतकरी यापासून वंचित राहून नुकसानभरपाईपासून मुकणार असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बाेलले जात आहे.
.......