लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून कारंजा आणि मानोरा येथे शासकीय कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला तरी, गेल्या पाच दिवसांत अद्याप एक किलो कापसाची खरेदीही होऊ शकली नाही. व्यापाºयांकडून कपाशीला मिळणारे दर हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपयांनी अधिक असल्याने शेतकरी शासकीय केंद्रांकडे कापूस विकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सध्या दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणेच यंदाही कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्याशिवाय लाल्या आणि इतर रोगांमुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. यंदा जिल्ह्यात केवळ १८६०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. आता कपाशीची वेचणी अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्यात व्यापाºयांनी कापूस खरेदीला महिनाभरापूर्वीच सुरुवात केली आहे. प्रामुख्याने कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात कपाशीची खरेदी होत आहे. आता जिल्ह्यात कारंजा आणि मानोरा येथे २० नोव्हेंबर रोजी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शुभारंभापासून गेल्या ५ दिवसांत या ठिकाणी कापसाचे बोंडही विक्रीसाठी आले नाही. शासनाने यंदा मध्यम लांबीचा धागा असलेल्या कपाशीसाठी प्रति क्विंटल ५१५०, तरे लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल ५४५० रुपये हमीभाव जाहिर केले आहेत. या उलट व्यापाºयांकडे ५८०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल कापूस उत्पादकांना मिळत आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांना यंदाही कापूस खरेदी करणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, पणन महासंघ (फेडरेशन) कें द्रीय कापूस महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून (सीसीआय) जिल्ह्यात कापूस खरेदी करीत असल्याचे पणन महासंघाचे मानोरा येथील शासकीय खरेदी केंद्राचे ग्रेडर एस. बी. जाजू यांनी सांगितले.
शासकीय खरेदी केंद्रांना प्रतिक्षा कापसाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 5:19 PM