वाशिम - कोरेगाव भीमा येथील दगडफेक घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. दगडफेक घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. या पृष्ठभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या जीविताला समाजकंटक व गावगुंडांकडून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांना शासनाने संरक्षण द्यावे , अशी मागणी आंबेडकरी अनुयायांनी १० जानेवारी रोजी केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासन व राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनामध्ये नमूद केले की, १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ भारिप-बमसंसह राज्यातील जवळपास २५० सामाजिक संघटनांच्या वतीने ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात बंद शांततेत सुरू असताना काही समाजकंटकाने या बंदला हिंसक वळण देण्याच्या हेतूने तोडफोड केल्याचे निवेदनात म्हटले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून कोरेगाव भीमा येथील घटनेला कारणीभूत असलेल्यांविरूद्ध कठोर कारवाई करून अटकेची मागणी केली. या गोष्टीचा राग धरून विविध संघटनेच्यावतीने सोशल मीडियामधून तसेच सांगली व कोल्हापूर येथे प्रतिमोर्चे काढून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य करण्यात आले. एकंदरित इतरांचा रोष पाहता अॅड. आंबेडकर यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भारिप बमसंचे वाशिम जिल्हा नेते मधुकरराव जुमडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजीव दारोकर, अजय ढवळे, सुनील कांबळे, पिरिपा जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, जिल्हा नेते अनंता तायडे, प्रा.सुभाष अंभोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पडघान, सिद्धार्थ धांडे, राकाँ सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद पट्टेबाहदूर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन राऊत, भारिप-बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष हरिदास बनसोड, जिल्हा सचिव नीलेश भोजने, भालन तायडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, प्रसिद्धी प्रमुख राहुल बलखंडे, आदिवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोके, रवी भगत, परमेश्वर अंभोरे, बालाजी गंगावणे, भूषण मोरे, सिद्धार्थ खंडारे, सोनाजी इंगळे, राहुल कांबळे, नाथा सरकटे, अनिल इंगळे, प्रवीण पट्टेबाहदूर आदींची उपस्थिती होती.