वाशिम : जैन धर्मियांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथील जगविख्यात अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानचे संरक्षण व संवर्धन व्हावे, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज, ५ फेब्रुवारी रोजी शिरपूर येथे व्यक्त केले. बुलडाणा दाैरा आटोपून राज्यपालांनी थेट शिरपूर गाठून अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताचे दर्शन घेतले. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राज्यपाल म्हणाले, शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान वाशिम जिल्हाच नव्हे; तर भारतभरात विविध ठिकाणी वसलेल्या जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. सर्वांच्या सहकार्यातून जैन संस्थानचाच नव्हे; तर संपूर्ण शिरपूर नगरीचा उद्धार व्हायला हवा, असे ते म्हणाले.
यावेळी विमलहंस विजय महाराज, परमहंस विजय महाराज, धामी ललितकुमार जयसिंग, दिलीपकुमार नवलचंद शाह, कांतीलाल चंदनमल बरडिया, पारसमल मदनलाल गोलेच्छा, शिखरचंद हुकुमचंद बागरेचा, मनिष दिपचंद संचेती, व्यवस्थापक बाबुराव बोराटे, अशोक शांतीलाल भन्साली, रवि बज, हरीश बज, शिरीश चवरे, समीर जोहरपुरकर, राहुल मनाटकर, संजय कान्हेड, देवेंद्र महाजन यांच्यासह आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमीत झनक, जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदिंची उपस्थिती होती. दिगंबर जैन संस्थानच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.राज्यपालांनी घेतले पार्श्वनाथांचे दर्शनयाप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जगविख्यात अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंतांचे गाभाऱ्यातील बोगद्यात जाऊन दर्शन घेतले. न्यायालयीन प्रक्रिया सुलभ होऊन सकल जैन समाजाला या मंदिरात दर्शन व पुजनाची संधी मिळावी, अशी प्रार्थना देखील राज्यपालांनी यावेळी केले.
गावभरात तगडा पोलीस बंदोबस्तराज्यपालांच्या दाैऱ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावभरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे परिस्थितीवर बारकाईने नियंत्रण ठेवून होते. शिरपूर येथे दर्शन आटोपून राज्यपालांनी वाशिमकडे प्रयाण केले.शिरपूरच्या विकासाकडे लक्ष देऊ - राज्यपालदाैऱ्यादरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विमलहंस विजय महाराज, परमहंस विजय महाराज यांच्याशी चर्चा करताना शिरपूरच्या विकासाकडे विशेष लक्ष देऊ, अशी ग्वाही दिली. तसेच गावातून मंदिराकडे येणाऱ्या कच्चा रस्ता तयार करण्यासाठी पुढाकार घ्या, अशी सूचना राज्यपालांनी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांना केली.