वाशिम : बाॅलिवूड अभिनेता गोविंद यांचा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ १३ एप्रिल रोजी वाशिम शहरात रोड शो झाला. मात्र, गोविंदाला जवळून पाहण्याची संधी तसेच सेल्फी घेता आली नसल्याने युवकांचा हिरमोड झाला. दुपारचे उन असल्याने एसी वाहनात बसूनच गोविंदाने सनरुफ उघडून अधून-मधून हातवारे केले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवार, १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गोविंदा वाशिमला येणार असल्याने प्रचारापेक्षा गोविंदाला पाहण्यासाठी किशोरवयीन मुलांनी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजताच्या सुमारास सिव्हिल लाईन येथून गोविंदाच्या रोड शोला सुरूवात झाली. सिव्हिल लाईन मार्गे बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक या रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रोड शो झाला. गोविंदाला पाहण्यासाठी रस्त्याच्या जवळील लोकांनी गर्दी केली होती. मात्र, ते बाहेर कमी आणि वाहनातच अधिक वेळ होते. त्यांनी वाहनातून बाहेर यावे म्हणून युवकांना नारेबाजी करावी लागली. तरीही ते अधिकाधिक वेळ बाहेर न आल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. रोड शो दरम्यान गोविंदा यांनी वाहनातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. रोड शो दरम्यान दुसऱ्या वाहनात शिंदेसेनेच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे, आमदार लखन मलिक, राजू पाटील राजे, ज्ञायक पाटणी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्त्यालगतच्या दुकानातून घेतला बूट
हा रोड शो बसस्थानकाजवळ येताच गोविंदाची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या जुनेद तेली यांच्या बुटाच्या दुकानावर पडली. वाहनांचा ताफा थांबवून दुकान गाठले आणि त्यांनी काळ्या रंगाचा बूट पसंत केला. बुटाची किंमत विचारली असता, विक्रेत्याने ३०० रुपये सांगितले. गोविंदाने पाचशे रुपये देऊन बूट खरेदी केला. रोड शो दरम्यान आपल्या कारचे सनरुफ उघडून खरेदी केलेला बूट गोविंदाने सर्वांना दाखवला.