- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आरक्षणाची स्थिती ‘जैसे थे’ ठेऊन ठरलेल्या तारखेलाच निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबरला दिला. यामुळे इच्छूक उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गणांमध्ये तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी लागणार असून भाजपासह काँग्रेस, रा.काँ. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या भुमिकेकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.भाजपाशी काडीमोड घेऊन शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने तथा महाविकास आघाडीच्या नावाने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक भाजपा स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेस, रा.काँ आणि शिवसेना हे तीन राजकीय पक्ष राज्यातील सत्ता स्थापनेसाठी अंगीकारलेल्या फॉर्म्युल्यानुसार एकत्र येऊन निवडणूक लढतात की त्यांच्याकडूनही स्वबळाचा नारा दिला जातो, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार की माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीसोबत जाणार, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांमध्ये विविध प्रमुख राजकीय पक्षांकडून निवडणूक लढविण्याची इच्छा बाळगून असलेल्या सच्चा कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास नाराजांची मनधरणी करण्यातही प्रमुख पक्षांची कसोटी लागणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
जि.प. निवडणूक : तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची लागणार कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 2:47 PM