लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : खारपाणपट्ट्यासह अनेक गावांचा कायापालट करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने आणली आहे. ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले. कृषी विभागाच्यावतीने आयोजित ग्राम वडगाव (इजारा), सोहळ, शेलुवाडा तसेच वाई येथे कृषी संजीवनी प्रकल्प रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, जिल्हा कृषी अधीक्षक गवसाने, तालुका कृषी अधिकारी वाळके यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात १४९ गावांचा समावेश असुन यामध्ये कारंजा ३३, मानोरा ३९, मालेगाव १७, मंगरूळपीर २२, रिसोड १८ तर वाशिम येथील २० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. योजनेच्या माध्यमातून खारपाणपट्ट्यासह गावांचा कायापालट होणार असुन गावासाठी भरीव योगदान देण्याची संधी ग्रामपंचायत व गावाला मिळाली आहे, त्यासाठी योगदान द्यावे. शेतीला जोड म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन असा पूरक व्यवसाय आवश्यक आहे. कृषी सहाय्यक यांनी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन आ.पाटणी यांनी केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक गावसाने तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी प्रकल्पाचे महत्व ग्रामस्थांना पटवुन सांगितले. या योजनेत ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असुन सरपंच समितीचे अध्यक्ष तर ग्रामसेवक सदस्य सचिव असतील. गावाचे सूक्ष्म नियोजन करून चांगला आराखडा तयार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.ग्राम वाई येथे ओमप्रकाश तापडीया, शारदाताई मनवर, अशोक पाटील ठाकरे, मुसाभाई, साहेबराव ठाकरे, दिनेश मनवर, बेबीताई मनवर, मनिषा उजवणे तर शेलुवाडा येथे सरपंच गोपाल काळे, अमोल जयस्वाल, योगेश जयस्वाल, बाबाराव मसके, दिगांबर जिरे, किसनराव भगत, विनायक देशमुख, धोंडबा जिरे तसेच वडगाव इजारा येथे सरपंच किशोर जाधव, जि.प.सदस्य मोहन महाराज, संजय जाधव, रमेश राठोड, चंदु जाधव यासह अनेकांची उपस्थिती होती.
कृषी संजीवनी योजनेत मिळालेल्या संधीचे सोने करा - राजेंद्र पाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 4:31 PM