रिसोड - शेतमाल खरेदीचा कोणताही परवाना नसताना रिसोड शहरात काही ठिकाणी शेतमालाची खरेदी सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. वजनकाट्यातही फसवणूक होत असल्याने शेतकºयांची आर्थिक लुट होत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसात सातत्य नसल्याने तसेच ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन झाले नाही. एकरी दोन ते पाच क्विंटलदरम्यान सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. हलक्या दर्जाच्या जमिनीत तर एकरी एक ते दोन क्विंटल उत्पादन झाल्याने लागवड खर्चही वसूल होणार नाही, असा दावा शेतकºयांनी केला. नैसर्गिक संकटे झेलत असतानाच, आता मानवनिर्मित संकटालादेखील शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे. रिसोड शहरात काही ठिकाणी खासगी व्यापाºयांनी कोणताही परवाना नसताना शेतमालाची खरेदी सुरू केली आहे. येथे वजनकाट्यातही फसवणूक होत असल्याची चर्चा आहे. कमी भाव आणि वजनकाट्यातील फसवणूक यामुळे शेतकºयांची एकप्रकारे आर्थिक लूट सुरू आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.
विनापरवाना शेतमालाची खरेदी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. लवकरच पाहणी केली जाईल. अवैधरित्या शेतमालाची कुणी खरेदी करीत असल्याचे आढळून आल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. - एम.बी. बनसोड,सहायक निबंधक, रिसोड.