अनसिंग (जि. वाशिम) : वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून चक्क ग्रामपंचायत प्रशासनानेच वीजचोरीचा उद्योग गत महिनाभरापासून चालविला असल्याचे धक्कादायक वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहे. ८ व ९ ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग ग्रामपंचायत प्रशासन वीज वितरणच्या स्थानिक अधिकार्यांच्या मेहरबानीने वीजचोरी कशी करीत आहे, याबाबत स्टिंग करण्यात आले. वीज गळती व वीज चोरी थांबविण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे कारवाईची धडक मोहीम राबविली जाते. वीजचोरी पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठनदेखील केले जाते. वीजचोरीप्रकरणी दंड आणि कारावास अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. ग्रामीण व शहरी भागात सर्वसामान्य नागरिकांकडून यापूर्वी वीजचोरीचे प्रकार घडलेले आहेत; मात्र स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय व निमशासकीय प्रशासनाद्वारेच दिवसाढवळ्या वीजचोरी होण्याचा प्रताप अद्यापपर्यंंत उघड झाला नसावा; मात्र आता याला अनसिंग ग्रामपंचायत अपवाद ठरत असल्याचे ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहे. गत एका महिन्यापासून अनसिंग येथील पथदिवे दिवस-रात्र सुरू आहेत. यामागील नेमके कारण कोणते, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, वीज वाहिनीवर आकोडे टाकून पथदिव्यांना सरळ वीजजोडणी केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला. गावात प्रत्येक खांबावर विद्युत दिव्याची व्यवस्था केली आहे. या दिव्यांना रितसर वीजजोडणी घेऊन वीजपुरवठा करणे ही बाब नियमात बसणारी आहे; मात्र अनसिंग ग्रामपंचायतने या नियमांना धाब्यावर बसवून चक्क चोरीद्वारे पथदिव्यांना वीजपुरवठा केला आहे. हा प्रकार गत महिन्यापासून सुरू असताना याकडे वीज वितरणच्या जबाबदार अधिकार्यांचे लक्ष जाऊ नये, ही शोकांतिका म्हणावी लागेल. पोलीस स्टेशन, मुस्लीम चौक, प.दी.जैन शाळा, इंदिरा आवास कॉलनी, तलाठी कार्यालयाजवळ असलेल्या खांबावरील पथदिवे आकोड्याद्वारे दिवसरात्र सुरू आहेत.
ग्रामपंचायत प्रशासन करतेय विजेची चोरी!
By admin | Published: August 10, 2015 1:35 AM