- संतोष वानखडेवाशिम : राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्यातील स्वतंत्र इमारती नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने २ मे रोजी मागितला आहे. त्यानुसार वाशिम जिल्हा परिषदेने ९७ ग्राम पंचायतींना स्वतंत्र इमारत नसल्याचा अहवाल ४ मे सादर केला. स्वतंत्र इमारतीसाठी ग्राम पंचायतींना निधी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.गावपातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयाला स्वमालकीची जागा आणि स्वतंत्र इमारत असणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींना स्वमालकीची जागा असूनही स्वतंत्र इमारती नाहीत. त्यामुळे भाडेतत्वावरील तसेच पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसलेल्या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालये थाटण्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यातही जवळपास ९७ ग्रामपंचायतींना स्वमालकीची जागा आहे; मात्र स्वतंत्र इमारत नाही. केंद्र सरकारच्या निधी आयोगांतर्गत आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत वाशिमसह नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या आकांक्षित जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत महत्वाकांक्षी जिल्ह्यातील स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींचा अहवाल राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे येथील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने २ मे रोजी मागविला आहे. शासनाच्या विविध योजना व इतर उपक्रमांमधून काही ग्राम पंचायतींना इमारत बांधकामे मंजूर झालेली आहेत. अशा इमारत मंजूर असलेल्या ग्रामपंचायती वगळून अद्याप ज्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकाम मंजूर झालेले नाही व बांधकामासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध आहे, अशा ग्राम पंचायतींच्या नावांची तालुकानिहाय यादी मागविली आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत (आरजीएसए) ग्राम पंचायतींच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्याची बाब विचाराधीन असून, त्यानुषंगाने हा अहवाल मागविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानुसार या चारही जिल्ह्यातून स्वमालकीची इमारत नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल पाठविण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ९७, नंदूरबार ४२, गडचिरोली ४३ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५१ अशा ग्राम पंचायतींचा समावेश आहे. स्वमालकीची जागा असलेल्या; परंतू स्वमालकीची इमारत नसलेल्या ग्राम पंचायतींचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील ९७ ग्राम पंचायतींचा अहवाल पाठविण्यात आला आहे.- नितीन माने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम.
आकांक्षित जिल्हयातील ग्राम पंचायत इमारतींचा अहवाल मागविला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 2:53 PM