वाशिम : वाशिम तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या १९३ जागेसाठी ४९२ उमेदवारांमध्ये लढत होत असून, अनसिंग, काटा, तामशी, वारा जहॉगीर, पार्डीटकमोर यासह प्रमुख ग्रामपंचायतींमधील लढतींकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.
वाशिम तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपला आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील तोंडगाव, सावरगाव जिरे, भोयता, किनखेडा, कोंडाळा झामरे या पाच ग्रामपंचायतींमधील एकूण ४७ जागेसाठी ४७ उमेदवारी अर्ज राहिल्याने ४७ जागा अविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता उर्वरित १९ ग्रामपंचायतींमधील १९३ जागांसाठी ४९२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होत असल्याने उमेदवारांसह पॅनल प्रमुखांनी प्रचाराला वेग दिल्याचे दिसून येते. वाशिम तालुक्यातील अनसिंग, उकळीपेन, काटा, तामशी, वारा जहॉगीर, पार्डीटकमोर, अडोळी, काजळांबा, वारला या प्रमुख ग्रामपंचायतींसह कळंबा महाली, पंचाळा, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहांगीर, ब्रह्मा, पिंपळगाव, तोरणाळा, टो, पार्डी आसरा या ग्रामपंचायतींमध्ये राजकारण ढवळून निघत आहे. ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रतिस्पर्धी गटाने व्यूहरचनेवर भर दिला तर सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी गटही जोमाने कामाला लागल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येते. ग्रामपंचायत पातळीवर आघाडी, पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्यात येत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार यंत्रणा सक्रिय होत असल्याचे दिसून येते.
अनसिंग, काटा, तामशीने वेधले लक्ष
अनसिंग, काटा, तामशी येथील ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची ठरत असल्याने याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असते. पाच वर्षानंतर सत्ता कायम राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश येते की सत्ताधाऱ्यांची सत्ता उलथून टाकण्यात विरोधकांची सरशी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.