वाशिम : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण ३२२६ उमेदवारांच्या भाग्याच्या फैसला करणाºया या मतमोजणीकडे राजकीय क्षेत्रासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा जिल्ह्यातील एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. दरम्यान, १६३ पैकी ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५ जानेवारी रोजी १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी सरासरी ७५.८६ टक्के मतदान झाले. १२३३ जागांसाठी ३२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरीय केंंद्रात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. ग्रामपंचायतींच्या वार्ड व सदस्य संख्येनुसार मतमोजणी केंद्रात टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून मतमोजणी केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.