लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ५० संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष 'वॉच' राहणार आहे. कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाचा आलेख खाली आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने गत १० दिवसांत संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करीत पथसंचलन, शांततेचे आवाहन, प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यात ५० संवेदनशील आणि ११ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असून, येथे गैरप्रकार, वादविवाद होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय फिरते पथकही भेटी देऊन पाहणी करणार आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची स्वत: व पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मतदान प्रक्रियेदरम्यान शांतता राखावी, असे आवाहन जनतेला केले. प्रतिबंधात्मक कारवायादेखील करण्यात आल्या. मतदानाच्या दिवशी या केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम
संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांना महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पथकांनी भेटी दिल्या असून, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्यक आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. - सुनील विंचनकरउपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम