- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापतींचा कस लागणार असून, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, ग्रामीण भागात राजकारण शिगेला पोहोचले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. आता ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक असल्याने आपल्या पॅनलला, समर्थकांना निवडून आणण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार विषय समिती सभापतींच्या गटातील जवळपास १९ ग्रामपंचायतींमध्ये अतितटीच्या लढती असून, यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील सहा पंचायत समितींचे सभापती, उपसभापतींनादेखील आपली राजकीय पत कायम ठेवण्यासाठी पं. स. गणातील ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
एक नजर जि.प. पदाधिकाऱ्यांच्या गटातील ग्रामपंचायतींवर
जिल्हा परिषद अध्यक्षांचा आसेगाव गट या गटाचे सदस्य चंद्रकांत ठाकरे हे ३२७८ मताधिक्क्याने निवडून आले होते. ते सध्या जि.प. अध्यक्ष असून, या गटातील नांदखेडा, फाळेगाव, सार्सी बो., चिंचखेडा या ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी तसेच समर्थकांना निवडून आणण्यासाठी त्यांचा कस लागणार आहे. यामध्ये कोण बाजी मारते? याकडे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा शिरपूर गटया गटाचे सदस्य डॉ. शाम गाभणे यांनी ३७३ मताधिक्क्याने विजय मिळविला होता. ते सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून, त्यांच्या गटातील एकमेव शिरपूर ग्राम पंचायतची निवडणूक होत आहे. शिरपूर ग्रामपंचायत ही विरोधी गटाच्या ताब्यात होती. सप्टेंबर महिन्यात येथे प्रशासकाची नियुक्ती झाली. शिरपूर ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी डॉ. गाभणे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
समाजकल्याण सभापतींचा उंबर्डा गट या गटाच्या सदस्य वनिता सिद्धार्थ देवरे यांनी १८३ मताने विजय मिळविला होता. त्या सध्या समाजकल्याण सभापती असून, या गटातील उंबडार्बाजार, दुधोरा या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांना राजकीय व्यूहरचना आखावी लागणार आहे.
बांधकाम सभापतींचा काटा जि.प. गट या गटाचे सदस्य विजय खानझोडे हे १०९७ मताधिक्क्याने निवडून आले होते. ते सध्या अर्थ व बांधकाम सभापती असून, या गटातील काटा, कोंडाळा झामरे, किनखेडा, तोरनाळा, भोयता या ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. समर्थकांना निवडून आणण्यासाठी त्यांना राजकीय कसब पणाला लावावे लागतील.
शिक्षण सभापतींचा तोंडगाव जि. प. गट या गटाचे सदस्य चक्रधर गोटे यांनी १३२ मते जास्त घेत प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली होती. ते सध्या आरोग्य व शिक्षण सभापती असून, या गटातील तोंडगाव व टो या देन ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. तोंडगाव ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची समजली जाते. ही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी त्यांच्या राजकीय मुत्सुद्देगिरीचा कस लागणार आहे.
बालकल्याण सभापतींचा तळप गट या गटाच्या सदस्या शोभा सुरेश गावंडे यांनी ७८४ मताधिक्क्याने विजय मिळविला होता. त्या सध्या महिला व बालकल्याण सभापती असून, या गटातील तळप बु., कारखेडा, गादेगाव, वरोली, सेवादासनगर या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली.