लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष नोंदणी मोहिमेत ग्रामपंचायत स्तरावर आठ हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी झाली आहे. दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी स्वनिधीतील पाच टक्के निधी राखीव ठेवला जाणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. हा निधी दिव्यांगांसाठी खर्च व्हावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांची नोंदणी आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांची नोंदणी होण्यासाठी विशेष नोंदणी मोहिम राबविण्याचे निर्देश समाजकल्याण विभागासह पंचायत विभागाला दिले होते. त्याअनुषंगाने मोहिम राबविली असून, आठ हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी राखीव असला तरी हा निधी पुर्णत: दिव्यांगबांधवांच्या कल्याणासाठी खर्च होत नाही, असा आरोप करीत यापूर्वी विविध सामाजिक संघटनांनी विविध टप्प्यात आंदोलने केली होती. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी हा निधी खर्च व्हावा म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. ज्यांची नोंदणी झाली नसेल, त्यांनी तातडीने ग्रामपंचायतमध्ये नोंंदणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी केले.स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीन, बे्रल लेखन साहित्य, ब्रेल टाईपरायटर, श्रवणयंत्रे, शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, कृत्रिम अवयव यासह अन्य वैयक्तिक योजनांसाठी तसेच सामुहिक योजनांमध्ये अपंग पुनर्वसन केंद्र, थेरपी सेंटर सुरू करणे, सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प्स, रेलिंग, स्वच्छतागृह, दिव्यांगांच्या स्वयंसहाय्यता गटांना अनुदान देणे, उद्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करणे यासह विविध योजनांचा लाभ मिळणे अपेक्षीत आहे.
ग्राम पंचायत स्तरावर आठ हजार दिव्यांगांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:32 PM