वाशिम : जिल्ह्यातील प्रती ग्राम पंचायतला ७५० याप्रमाणे एकूण ४९१ ग्रामपंचायतींना तीन लाख ६८ हजार २५० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने दिले आहे.५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्ष लागवड केली जाणार आहे. अन्य विभागांप्रमाणेच ग्राम पंचायतींनादेखील वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे प्रत्येक ग्राम पंचायतने किमान ७५० रोपांची लागवड करावी, असे उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, एकूण उद्दिष्ट तीन लाख ६८ हजार २५० आहे. सर्वाधिक ग्राम पंचायती कारंजा तालुक्यात असून, या तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींना ६८ हजार २५० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या खालोखाल वाशिम तालुक्यातील ८४ ग्राम पंचायतींना ६३ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींना ६२ हजार २५०, रिसोड तालुक्यातील ८० ग्राम पंचायतींना ६० हजार, मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींना ५७ हजार ७५० आणि मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींना ५७ हजार रोपांची लागवड करावी लागणार आहे. १ ते ७ जुलै दरम्यान वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे आतापासूनच वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्राम पंचायत प्रशासनाला केल्या आहेत.
ग्राम पंचायतींना ३.६८ लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट !
By admin | Published: May 21, 2017 7:02 PM