वाशिम, दि. १७- विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने गुरुवारी कामकाजाचे संपूर्ण दप्तर पंचायत समितीकडे सोपवून बेमुदत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जिल्हाभरात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील कामकाज खोळंबले आहे.ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्या निकाली काढण्याची मागणी वारंवार करण्यात आली; मात्र अद्यापही याकडे शासनाने लक्ष दिले नाही. परिणामी, ग्रामसेवक संघटनेने आंदोलनाची रूपरेषा तयार केली असून, त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील ग्रामसेवकांनी आपल्याकडील दप्तर व ग्रामपंचायतींच्या चाव्या पंचायत समिती प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्याने ग्रामीण भागातील कामकाज ठप्प झाले. कंत्राटी ग्रामसेवकाचा ३ वष्रे सेवाकाळ तत्काळ नियमित करावा, सोलापूर जिल्ह्यातील २३९ ग्रामसेवकांवर केलेली चुकीची कार्यवाही रद्द करावी, ग्रामसेवकांना तीन हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करणे, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, सन २0११ च्या लोकसंख्येवर आधारित ग्राम विकास अधिकारी पदे व साजे निर्माण करणे, जादा ग्रामसभा बंद करून १५ ऑगस्ट व २६ जानेवारीची ग्रामसभा त्या दिवशी न ठेवता दुसर्या दिवशी ठेवावी व ग्रामसभेची संख्या कमी करावी, ग्रामसेवक संवर्गास वैद्यकीय कॅशलेश सुविधा मिळाव्या, विस्तार अधिकारी यांच्या पदात वाढ करणे, २00५ नंतरचे ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामसवेक संवर्ग सुधारित जॉब चार्ट लागू करावा, निलंबित ग्रामसेवकांना प्राधान्यक्रमाने कामावर घ्यावे, राज्यभर ग्रामसेवकावर मारहाण, हल्ले, खोट्या केसेस होतात यावर आळा म्हणून सेवा संरक्षण व सरकारी कर्मचारी मारहाण हा गुन्हा अजामीनपात्र करावा, आदी मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व ग्रामसेवक गुरुवारपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
ग्रामपंचायतींच्या चाव्या पंचायत समिती प्रशासनाकडे सुपूर्द !
By admin | Published: November 18, 2016 2:28 AM