लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायतींनी पावसाळ्यात जमिनीवर कोसळणाºया पाण्याचे संकलन व संचय करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व सरपंचांना पत्रान्वये केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची यंत्रणाही कामाला लागली आहे.प्रधानमंत्री मोदी यांनी सरपंचांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते, आपण सर्व भाग्यवान आहोत की, आपल्या देशाला निसर्गाने पावसाचे पुरेसे पाणी दिले आहे. हे पाणी संकलित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले होते. दरम्यान, १७ जून रोजी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी जलसंधारणाच्या कामात हिरीरीने सहभाग नोंदविलेल्या जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडे प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्र्यांचे पत्र सुपूर्द करून पावसाच्या पाण्याचा संचय करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सोपविली. दरम्यान, यासंदर्भात २२ जून रोजी बहुतांश ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून सर्व ग्रामस्थांसमोर प्रधानमंत्र्यांच्या पत्राचे वाचन केले. त्यानुसार पावसाच्या पाण्याच्या संकलनासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.
पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 3:27 PM