अनसिंग (जि. वाशिम) : अनसिंग ग्रामपंचायतचा वीजचोरीचा गोरखधंदा लोकमतने १0 ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणताच, ग्रामपंचायत प्रशासन आणि वीज वितरण कंपनी शाखा अनसिंग व वाशिमच्या तंबूत एकच खळबळ उडाली. कर्तव्याला जागत अखेर वीज वितरण कंपनी शाखा अनसिंगने ११ ऑगस्टपासून अवैध वीजजोडणी तोडण्याला सुरूवात केली आहे. वीज गळती व वीज चोरी थांबविण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे कारवाईची धडक मोहिम सुरू असतानाच, अनसिंग येथे मात्र वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिकार्यांच्या मूकसंमतीने ग्रामपंचायत प्रशासनानेच वीजचोरीचा गोरखधंदा गत एका महिन्यापासून सुरू केला होता. वीज वाहिणीच्या तारावर आकोडे टाकून पथदिव्यांना अवैध वीजजोडणी घेतली होती. ग्रामपंचायत प्रशासनाचा वीजचोरीचा हा गोरखधंदा ह्यलोकमतह्णने उजागर करताच ११ ऑगस्टला सकाळी ८ वाजतापासून स्थानिक श्रृंगऋषी कॉलनीतील वीज खांबाजवळ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी हजर झाले. या कॉलनीतील जवळपास आठ खांबावरील आकोडे काढून अवैध वीजजोडणी तोडण्यात आली. वाशिम जिल्ह्यात वीजचोरीप्रकरणी यापूर्वी वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य नागरिकांविरूद्ध दंड वसूली आणि विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. आता शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील शेवटचा घटक असलेल्या ग्रामपंचायतविरूद्ध वीज वितरण कंपनी वीजचोरीप्रकरणी किती दंड वसूल करते आणि संबंधितांविरूद्ध कोणता गुन्हा दाखल करते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
ग्रामपंचायतीची वीजजोडणी अखेर तोडली
By admin | Published: August 12, 2015 12:41 AM