वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्याची विक्री व्हावी म्हणून जिल्ह्यातील ११ हजार ३८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी विहित मुदतीत तीन हजार शेतकऱ्यांच्या ४५ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. हरभरा खरेदीला मुदतवाढ मिळणार की नाही या प्रश्न अनुत्तरीय असून बाजार समिती व खासगी ठिकाणी हरभºयाला मातीमोल भाव मिळत आहेत.
शेतमालाला हमीभाव मिळावे या दृष्टिने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली जातात. शेतमाल खरेदी करण्यापूर्वी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले जाते. त्यानुसार विहित कागदपत्रांची पुर्तता करून आॅनलाईन नोंदणी केली जाते. वाशिम जिल्ह्यात विहित मुदतीपर्यंत एकूण ११ हजार ३८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांच्या हरभरा या शेतमालाची विहित मुदतीत खरेदी होणे अपेक्षीत होते. २९ मे पर्यंत हरभरा खरेदी सुरू होती. विहित मुदतीत जिल्ह्यातील केवळ तीन हजार शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी करण्यात आल्याने, उर्वरीत आठ हजार शेतकरी वंचित राहिले आहेत. मध्यंतरी साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध नसल्याने हरभऱ्याची खरेदी मंदावली होती. खरेदीचा वेग संथगतीने राहिल्याचा फटका वाशिम जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांना बसला आहे. हरभरा खरेदीला मुदतवाढ मिळेल, या अपेक्षेने आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा साठवून ठेवला आहे. बाजार समिती किंवा खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा खरेदी केली जाते. नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी केली.