मालेगाव : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून मे २०१९ पासून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांना स्थगिती दिली होती. आता १५ जानेवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामसभावरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये येत्या २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ताकदिनी ग्रामसभा होणार असून, मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी या सभेचे नियोजन सुरू केले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३) नुसार प्रत्येक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. तथापि, देशभरात २०१९ च्या सुरुवातीपासूनच कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू लागला. त्यामुळे शासनाने लाॅकडाऊन जारी केले आणि विविध सार्वजनिक, धार्मिक आणि गर्दी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांच्या प्रत्यक्ष आयोजनावर मर्यादा घातल्या. यासाठी वेळोवेळी अधिसूचना आणि आदेशही निर्गमित करण्यात आले. यात ग्रामपंचायतीअंतर्गत होणाऱ्या ग्रामसभांवरही स्थगिती होती. आता कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनाववरील स्थगिती उठविण्यात आली असून, ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्स, तसेच कोविड-१९च्या आनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे कोटकोर पालन करून ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. ग्रामविकास विभागाच्या या निर्णयामुळे आता पूर्वीप्रमाणेच ग्रामसभा पार पडणार असल्याने गावातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार आहे. या आनुषंगाने मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे नियोजन सुरू केले आहे.