वाशिम : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची १५ लाखांच्या आतील कामे अद्यापही सुरू न करणाऱ्या ग्राम पंचायतचे ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी यांची एकाच दिवशी सामुहिक सुनावणी लावण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वसुमना पंत यांनी मंगळवारी (दि.१) सहाही गट विकास अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी सर्व तालुक्याचे गट विकास अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सीईओ वसुमना पंत यांनी बैठकीच्या सुरुवातीला कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नव्यानेच सुरु करण्यात आलेली मोदी आवास योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना दिल्या. घरकुलाच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या तालुका व ग्राम पंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. पावसाळ्याच्या दिवसात जलस्त्रोत दुषित होण्याची शक्यता अधिक असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि गावातील जलस्त्रोतांची तपासणी करून प्राप्त निकषानुसार योग्य उपयायोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सध्या स्वच्छ भारत मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी गट विकास अधिकारी यांना दिले. बैठकीला गटविकास अधिकारी सर्वश्री अरुण मोहोड, बालासाहेब बायस, प्रफुल्ल तोटेवाड, उदय जाधव, नरेगाचे गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने, सहायक प्रकल्प संचालक सचिन गटलेवार, वाशिम पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी गजानन खुळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.