लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा: गतवर्षी कारखेडा ग्रामपंचायतला प्राप्त झालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत तत्कालीन ग्रामसेवक एज.जे. राठोड यांनी गैरप्रकार केल्याची तक्रार झाली. चौकशीत तथ्य आढळले असतानाही, अद्याप कारवाई नाही. दोषीविरुद्ध कारवाई करावी अन्यथा ११ जुलैपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा प्रदीप मोहनराव सोळंके यांनी दिला. ७ जुलै रोजी सोळंके यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.तक्रारकर्ते प्रदीप सोळंके यांनी तक्रारीत म्हटले की, १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत कारखेडाच्या विकासासाठी ६ लाख रुपये निधी मंजूर झाला. त्यात स्ट्रिट लाइट, विहीर दुरुस्तीची कामे दाखविण्यात आली. या कामात गैरप्रकार करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. ई-निविदा केली नाही तसेच विहीर दुरुस्तीवर जादा रक्कम खर्च केल्याचे दिसून येते. तत्कालीन ग्रामसेवक राठोड यांची दप्तर चौकशी करावी, असा ठराव घेण्यात आला होता. आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी होऊनही संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झाली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव ११ जुलैपासून बेमुदत उपोषणाला बसावे लागेल, असे सोळंके यांनी तक्रारीत नमूद केले. याबाबत २२ मार्च २०१७ व २६ जून रोजी तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकाऱ्यांनी (पंचायत) केली होती. त्यांच्या अहवालात तत्कालीन सचिव राठोड दोषी दिसून येतात, असा स्पष्ट उल्लेख आहे. तरीही कारवाई नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी केली आहे. चौकशीत ग्रामसेवक दोषी आढळले. त्यांना तशा नोटिस बजावल्या व वरिष्ठाकडे हे प्रकरण कार्यवाहीसाठी पाठविले आहे.- गुलाबराव राठोड गटविकास अधिकारी, मानोरा
चौकशीत ग्रामसेवक दोषी; कारवाईस विलंब
By admin | Published: July 10, 2017 2:04 AM