वाशिम : प्लॉटची कर पावती व नमुना आठ अ देण्याच्या नावाखाली सहा हजार रुपयाची मागणी करणार्या पंचाळा येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. वाशिम तालुक्यातील पंचाळा ग्रामपंचायत हद्दीतील एका प्लॉटच्या सन २0१२ पासून कर पावत्या आणि नमुना आठ अ देण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता नामदेव मोरे यांनी तक्रारदाराला सहा हजार रुपयाची मागणी केली होती. सदर रक्कम ग्रामसेवक तुळशिराम ग्यानूजी महल्ले यांना दिल्यानंतर कर पावत्या आणि नमुना आठ अ दिला जाईल, असे तक्रारदाराला सांगण्यात आले. ग्रामसेवक महल्ले यांनी या प्लॉटच्या सात-बाराचे कामही आमच्या हिशेबानुसार करून दिले जाईल, तुम्ही फक्त पैशाचे तेवढे बघा, असे तक्रारदाराला सांगितले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाशिम कार्यालयात तक्रार नोंदविली. १६ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराला या कामानिमित्त वाशिम पंचायत समिती येथे पाठविण्यात आले. यावेळी ग्रामसेवकाने सहा हजार रुपयाची मागणी करताच, दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामसेवकाला ताब्यात घेतले. लाचेची मागणी केल्याची कबुली दिल्याने ग्रामसेवकाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून २५ नोव्हेंबर रोजी ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८, कलम ७ नुसार कारवाईसाठी आरोपींना ताब्यात घेतले असून, वाशिम पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंंंत सुरू होती. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.बी.हांडे यांच्या पथकाने केली.
लाचेची मागणी करणारा ग्रामसेवक जेरबंद
By admin | Published: November 27, 2015 1:50 AM