लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हास्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १३ आॅगस्ट रोजी ग्रामसेवक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला. त्यानंतर राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होत जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे दिले. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे, वेतन त्रूटी दूर करणे, जूनी पेन्शन योजना लागू करणे, अतिरिक्त कामे कमी करणे यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने विविध टप्प्यात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. पहिल्या टप्प्यात ९ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे देत असहकार आंदोलन केले. दुसºया टप्प्यात १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर राज्यव्यापी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सहभागी होत जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. तत्पूर्वी जिल्हास्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चा काढण्यात आला. ग्रामसेवकांची पदोन्नती प्रक्रिया निकाली काढावी, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव परत करावी, परिभाषित अंशदायी निवृत्त वेतन योजनेंतर्गत (डीसीपीएस) कपातीच्या पावत्या ग्रामसेवकांना द्याव्या, ग्रामसेवक संवर्गाच्या वैद्यकीय देयकांची परिपूर्तता करावी, निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यामुळे त्यांना त्वरीत सेवेत घेण्यात यावे यासह अन्य प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्या अशी एकमुखी मागणी करण्यात आली.