लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत जिल्ह्याचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश झालेला आहे. यामुळे ‘लॉकडाऊन’ १७ मे पर्यंत वाढला असला तरी जिल्ह्यात सोमवार, ४ मे पासून व्यापार सुरू होऊन सर्व प्रकारचे व्यवहार पुर्वपदावर येणार आहेत. यासोबतच खबरदारीच्या दृष्टीकोणातून काही निर्बंध कायम राहणार आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी ३ मे रोजी यासंबंधी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन विचारविनिमय केला.राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने अक्षरश: हाहा:कार माजविला आहे. वाशिम जिल्ह्याच्या नजिक असलेल्या अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्याने अर्धशतक गाठले असून बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही दिवसागणिक कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे एकमेव कोरोनाबाधीत रुग्ण आढळला होता; परंतु त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अंतीम अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने २५ एप्रिल रोजी त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर आजतागायत एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळलेला नाही. ही वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत सुखद वार्ता आहे.दरम्यान, गत २१ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याने जिल्ह्याचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश झाला आहे. त्यानुषंगाने ४ मे पासून सर्वच प्रकारचा व्यापार सुरू करण्यास मुभा मिळणार आहे. यासह सलूनची दुकाने, शेतीविषयक सर्व कामे, मद्यविक्री सुरू होणार आहे; मात्र ज्याठिकाणी तुलनेने अधिक गर्दी होण्याची शक्यता असते अशी चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, शाळा-महाविद्यालये शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील. यासोबतच सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम आणि क्रिडा स्पर्धा आयोजित करता येणार नाहीत. प्रशासनाची अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनमध्ये प्रवेश करण्यास मनाई असणार आहे. प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींना घेऊन बस सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे; परंतू बस सेवा केवळ ‘ग्रीन झोन’च्या आतमध्येच उपलब्ध राहणार आहे. या नियमाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. अंमलबजावणीची जबाबदारी घटना कमांडरकडे ‘लॉकडाऊन’ काळात राबविण्यात येणाºया प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी हे कार्यकारी दंडाधिकारी यांची संबंधित स्थानिक कार्यक्षेत्रात घटना कमांडर म्हणून नेमणूक करणार आहेत. कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित विभागातील अधिकारी हे घटना कमांडरच्या निर्देशानुसार कार्य करतील. आवश्यकतेनुसार घटना कमांडर पास जारी करतील, असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
व्यापाऱ्यांत धास्ती; दुकानांची वेळ कमी करण्याची गळ! जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ मे रोजी दुपारी १२ वाजता वाशिममध्ये महत्वाची बैठक पार पडली. शासनाच्या निर्देशानुसार ‘ग्रीन झोन’ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली; मात्र सद्याची परिस्थिती पाहता, धास्तावलेल्या अनेक व्यापाºयांनी ही वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ किंवा दुपारी २ वाजतापर्यंतच ठेवावी, अशी गळ जिल्हाधिकाºयांना घातली.
वाशिम जिल्ह्यात सद्यातरी कोरोनाबाधीत एकही रुग्ण नाही. यामुळे जिल्ह्याचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश झाला असून राज्यशासनाच्या निर्देशानुसार ४ मे पासून सर्वच प्रकारचा व्यापार सुरू करण्यास मुभा दिली जात आहे; मात्र सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतलरण तलाव, शाळा, महाविद्यालये, कोचींग क्लासेस बंदच राहतील. नागरिकांनी ‘फिजीकल डिस्टन्सिंग’, तोंडाला मास्क लावण्याचे बंधन पाळावे- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम