या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मुंग पिकाने पाठ फिरविली असताना उन्हाळ्यात भुईमूग या पिकाकडे शेतकऱ्यांनी कल वाढविला होता. पेरासुद्धा मोठ्या प्रमाणात केला. मात्र भुईमूग पिकाच्या झाडांना फक्त दोन ते चारच शेंगा लागल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. पेरणी, फवारणी, रासायनिक खते या खर्चाच्या तुलनेत भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे. भुईमूग पिकासाठी रात्रंदिवस एक करूनही त्याच्या उत्पादनात घट आल्याने आणि पेरणीचे दिवस तोंडावर असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. लागवड खर्च वसूल होईल की नाही या चिंतेत शेतकरी असल्याचे दिसून येते. कडक निर्बंध असल्याने रब्बी हंगामातील पिकाच्या मालाची विक्री करण्यातसुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. सद्य:स्थितीत भुईमूग पिकाला चार ते पाच शेंगांची फळधारणा असल्याने यावर्षीही केलेला खर्चही निघणे कठीण झाले असून शासनाने त्वरित भुईमूग पिकाचा सर्व्हे करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी मानोरा परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.
कोट
गेल्या वर्षी सोयाबीनचे पीक आठ एकर शेतीमध्ये पेरले. त्याचा फारसा उतारा झाला नाही. त्यानंतर भुईमुगाची लागवड केली. मात्र झाडे वाढली; पण खाली शेंगा धरल्या नाहीत. तीन-चार शेंगा धरल्या आहेत. त्यामुळे लागवड खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे.
- अरविंद इंगोले, कारपा