लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस आलेल्या पावसामुळे भुजल पातळीत १.१९ मिटरने वाढली आहे. त्यात आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे भुजल पातळीला अधिकच आधार झाला असून , यंदा पाणी समस्येची तीव्रता कमी होण्यासह सिंचनाची समस्याही मिटल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्यात सरासरी ७९८.७० मि.मी. पाऊस पडतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र, पावसाची अनियमितता वाढल्याने पावसाची सरासरी कमी होऊन त्याचा भुजल पातळीवर भीषण परिणाम झाला आहे. भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ७९ सर्वेक्षण विहिरींचे करून तयार केलेल्या अहवालावरूनच हे स्पष्ट होते. या संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गत पाच वर्षांतील आॅक्टोबर महिन्याच्या अखेरची भुजल पातळी ही २.६१ मीटर असून, यंदाची अर्थात आॅक्टोबर २०१९ ची भुजल पातळी ही १.४२ मिटर असल्याचे दिसून आले. अर्थात यामुळेच जिल्ह्यातील भुजल पातळीत गत पाच वर्षातील सरासरीनुसार यंदा १.१९ मीटरची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.गतवर्षी अपुऱ्या पावसानंतर जिल्ह्यात सिंचनासाठी वारेमाप उपसा झाल्याने भुजल पातळी जवळपास सव्वा मिटरने खालावली होती. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर संपेपर्यंतही पावसाची सरासरी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे यंदा भुजल पातळीची स्थिती चिंताजनक होती. तथापि, सप्टेंबरच्या अखेरनंतर परतीचा पाऊस चांगला कोसळला, तर आॅक्टोबर महिन्याच्या मध्यंतरानंतर अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडल्याने भुजल पातळीला मोठा आधार मिळाला असून, आॅक्टोबर महिन्यातच भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ७९ सर्वेक्षण विहिरींचे सर्वेक्षण केल्यानंतर भुजल पातळीत १.१९ मिटरने वाढ झाल्याचे आढळून आले. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचन करणे सोपे होणार आहे. तथापि, पावसानंतर तात्काळ झालेल्या सर्वेक्षणातील ही वाढ असून, डिसेंबरनंतरही पातळी कमी होणार आहे. डिसेंबरनंतर करण्यात येणाºया सर्वेक्षणातील भुजल पातळीवरूनच जिल्ह्यातील भुजल पातळीची तीव्रता स्पष्ट होणार आहे. मंगरुळपीरमधील स्थिती सर्वात उत्तमजिल्ह्यात यंदा प्रत्यक्ष पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर कोसळलेल्या पावसामुळेच भुजल पातळीला मोठा आधार झाला असला तरी, त्यात सर्वाधिक वाढ ही कारंजा तालुक्यात दिसून येत आहे. या तालुक्यात ११ सर्वेक्षण विहिरींच्या तपासणीनुसार गत पाच वर्षांतील भुजल पातळी ३.४० असताना यंदाची भुजल पातळी ही १.६७ मीटर अर्थात गत पाच वर्षाच्या सरासरीच्या दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले. या सरासरीचा विचार करता कारंजा तालुक्यात भुजल पातळीत १.७३ मीटरने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्या खालोखाल मंगरुळपीर तालुक्याची भुजल पातळी १.३० मीटरने वाढली आहे. मानोरा तालुक्यात मात्र यंदाची भुजल पातळी १.९२ मीटर असतानाही गत पाच वर्षाच्या तुलनेत या तालुक्यातील भुजल पातळी केवळ ०.९८ मीटरने वाढली आहे.
अवकाळी पावसामुळे वाढली भुजल पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:04 PM