शिखरचंद बागरेचा /वाशिम
भारत देश हा कृषिप्रधान आणि ऋषिप्रधान देश आहे. संपूर्ण जगात प्राचीन काळापासून आपल्या सर्वधर्मीय व बहुरंगी संस्कृ तीचा वेगळा ठसा उमटविणार्या भारताची ओळख आता सर्वात युवा राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. एकविसाव्या शतकातील महासत्ता बनू पाहणार्या या देशाची युवा पिढी मात्र व्यसनांच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत असल्याचे वास्तव पाहण्यास मिळत आहे. देशाच्या युवा पिढीची व्यसनधीनता हा अत्यंत चिंताजनक विषय असून, यावर वेळीच उपाययोजना करून लगाम घातला गेला नाही, तर याचे भविष्यात गंभीर दुष्पपरिणाम देशभर झाल्याशिवाय राहणार नाही, असा सूर लोकमत परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालय येथे युवा पिढीचे व्यसन फॅॅड या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत साईकृपा व्यसनमुक्ती कार्य केंद्राचे संचालक डॉ. राजीव अग्रवाल यांच्यासह अमोल खडसे, आय. एच. पठाण, अमोल धोंगडे व जनार्धन काळबांडे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला होता.