या वेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रत्येक नुकसानीचे पंचनामे अचूकपणे होणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित नसला तरीही त्याच्या शेतपिकांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करावेत. यामध्ये जमीन खरडून जाणे, पिकांचे नुकसान यासारख्या प्रत्येक नुकसानीची नोंद घ्यावी. पंचनाम्यातील त्रुटीमुळे किंवा नुकसानीचा उल्लेख पंचनाम्यात नसल्याने संबंधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. हे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा; तसेच घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू आदी बाबींचे पंचनामे करून त्याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तातडीने पाठवावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी या वेळी दिल्या.
०००००००
रस्ते दुरुस्तीची कार्यवाही करावी
पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील काही रस्त्यांचे नुकसान झाले आहे. रस्ते दुरुस्तीची कार्यवाही संबंधित विभागाने तातडीने सुरू करावी. तसेच विजेचे खांब पडल्यामुळे अथवा इतर कारणांनी काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
००००००००
लसीकरण मोहिमेला गती द्यावी
कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी. ज्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा भागांवर अधिक लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढवावे. या भागांमध्ये जनजागृती करून लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या.