यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई यांनी यावेळी मान्सूनपूर्व तयारी, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम, लहान मुलांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र वार्डची सद्यस्थिती आदी बाबींचा आढावा घेतला.
पालकमंत्री देसाई म्हणाले, मान्सून काळात ग्रामीण भागातील काही रस्त्यांवरील पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीतही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे या अनुषंगाने विशेष खबरदारी घ्यावी व अशा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. धोकादायक इमारतींमुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणने त्वरित कार्यवाही करून सदर वीज पुरवठा पूर्ववत करावा. तलाव, बंधाऱ्यातील पाणी शेतीमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंत, पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधाविषयी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
०००
अन्नधान्य, औषधसाठा उपलब्ध ठेवणार
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्हा प्रशासनाने केलेली मान्सूनपूर्व तयारी व कोरोना सद्यस्थितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील ५ गावांना पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये तीन महिन्यांसाठी लागणारे अन्नधान्य व पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात येईल. तसेच पुरामध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी बचाव पथके तयार करण्यात आली आहेत. मान्सून कालावधीत पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा, शुध्द पाणी पुरवठा याविषयी उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींचे सुमारे ४४ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.