वाशिम : कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायू व रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याविषयी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी २२ एप्रिल रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. जिल्ह्यासाठी नियमितपणे आणि पुरेशा प्रमाणात प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी त्यांनी तातडीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून आवश्यक सूचना केल्या.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर हे या आढावा बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना बाधितांवर उपचारासाठी आणखी सुविधा वाढविण्यासाठी तातडीने नियोजन करावे. जिल्हा कोविड रुग्णालय तसेच कारंजा येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची संख्या वाढविण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करावी. जिल्हा कोविड रुग्णालय येथील ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ कार्यान्वित झाल्यानंतर दर मिनिटाला २०० लिटर प्राणवायू तयार होणार आहे. याठिकाणी आणखी एक दर मिनिटाला ६०० लिटर प्राणवायू निर्मिती करणारा प्लान्ट उभारण्यासाठी त्वरित नियोजन करून आवश्यक कार्यवाही गतिमान करावी.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या आणखी वाढवावी लागणार आहे. यासाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही गतिमान करावी. जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याची कार्यवाही करावी. तसेच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात लसीकरण केंद्रांचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.
जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूचा पुरवठा सध्या अकोला व अमरावती येथून होत आहे. प्राणवायू व रेमडेसिविरचा पुरवठा जिल्ह्याला नियमितपणे व्हावा, यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह, अमरावती विभागासाठी नियुक्त नोडल अधिकारी अश्विन मुदगल आणि अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून त्यांना आवश्यक सूचना केल्या.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, ग्रामीण भागामध्येसुद्धा कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक असून अधिकाधिक प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. तसेच ग्रामीण भागात लसीकरणावर अधिक भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत जिल्ह्याच्या सीमेवर ३३ ठिकाणी नाकाबंदी येणार आहेत. तसेच ५८ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
०००
बाक्स
अकोला व अमरावती येथून प्राणवायू
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात सध्या प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांवर ३३६ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच २३ रुग्णांवर ‘एनआयव्ही’च्या साहाय्याने उपचार सुरू आहेत. जिल्ह्यासाठी ५ मेट्रिक टन प्राणवायूचा साठा निश्चित करण्यात आला असून अकोला व अमरावती येथून हा प्राणवायू उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात सध्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.