०००००००
बालविवाहासंबंधी माहिती देण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.
००००
राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला
वाशिम : नव्याने तयार करण्यात येत असलेल्या वाशिम-हिंगोली राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने होत आहे. काही ठिकाणी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
००००
रेल्वेचे भाडे कमी करण्याची मागणी
मालेगाव : कोरोनापूर्वी वाशिमवरून अकोलापर्यंतच्या ८० किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरिता इंटरसिटी एक्सप्रेसने ४५ रुपये लागत असत. आता मात्र प्रवाशांना ९५ रुपये मोजावे लागत असून भाडे कमी करण्याची मागणी दत्ता जाधव यांनी स्थानक प्रमुखांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
०००
कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित
अनसिंग : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कामकाज केलेल्या ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत मानधन मिळालेले नाही. हे मानधन देण्यात यावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
००
भूखंडाची खरेदी प्रक्रिया ठप्प
वाशिम : राज्याच्या इतर जिल्ह्यात भूखंडाची शासकीय खरेदी-विक्री सुरु असताना वाशिम जिल्ह्यात बंद आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून ही प्रक्रिया सुरु करण्यात यावी, अशी मागणी भीमसंग्राम सामाजिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली.